मराठी माध्यम वरदानाचा स्वीकार

Home » मराठी माध्यम वरदानाचा स्वीकार

अनुदानित मराठी माध्यम हे महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचे प्रमुख माध्यम असून अनुदानित मराठी शाळांमध्ये पुरेसे शिक्षण घेतलेलेच शिक्षक नेमण्यासाठी सरकार दक्ष असते. पात्र शिक्षक नेमून त्यांना सरकार भरपूर पगार, सवलती, भत्ते, प्रशिक्षण देते. अशा शाळांमध्ये सरकारी खर्चाने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, कला शिक्षण मिळते.
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पान कसे शिकवावे याचे परिणामकारक तंत्र अनुदानित मराठी माध्यम शाळाशिक्षकांना समजावून देतात. शैक्षणिक बाबीतील सरकारच्या अशा पाठिंब्यामुळे अनुदानित मराठी शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम आणि सर्वत्र समान असतो.
विनाअनुदानित इंग्रजी शाळाशिक्षकांच्या नशिबात भरपूर पगार, सवलती, भत्ते, प्रशिक्षण नाही. अशा शाळेतील बहुसंख्य शिक्षकांना खोदकाम मजूर, रखवालदार, धुणीभांडीवाले घरकामगार यांच्यापेक्षा कमी पगार मिळतो. विनाअनुदानित इंग्रजी शाळा इतका कमी पगार देत असल्यामुळे पुरेशा पात्रतेचे, प्रशिक्षित उमेदवार त्यांच्याकडे शिक्षकपदासाठी अर्ज करीतच नाहीत मात्र कमी पात्रतेचे, अप्रशिक्षित आणि कधीकधी अगदी दहावी नापास लोकही त्यांच्याकडे शिक्षकपदासाठी अर्ज करतात. विनाअनुदानित इंग्रजी शाळाशिक्षकांच्या पात्रतेची छाननी सरकार करत नाही आणि शिक्षकांच्या पात्रतेची पालकही घेत नाहीत याचा फायदा घेऊन बहुसंख्य विनाअनुदान इंग्रजी शाळा कमी पगारावर अपुऱ्या पात्रतेचे जे लोक शिक्षक म्हणून नेमतात, ते कोणतेही विषय धड शिकवू शकत नसले तरी शिक्षकाचा अभिनय (acting) उत्तम करतात.
अनुदानित मराठी शाळेत मुख्याध्यापक कक्षात सर्वांना दिसेल asa – शिक्षकापासून शिपायापर्यंत सर्वांच्या शैक्षणिक पात्रतेची (उदा. सुमन फडके – BSc BEd) यादी असते. विनाअनुदान इंग्रजी शाळाशिक्षक ज्या वर्गांना शिकवतात त्यासाठी आवश्यक पात्रता त्या सर्वांकडे नसल्याने या शाळांमध्ये सर्वांना दिसेल अशी शिक्षकांच्या पात्रतेची यादी लावलेलीच नसते.
नाईलाजाने नेमलेल्या अपात्र शिक्षकांकडे शिकवण्याचे कौशल्य नसल्याने ते फळ्यावर जसेच्यातसे धडे लिहून काम भागवतात त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी घरी तेच धडे पुन्हापुन्हा लिहितात कारण त्यांचे बहुसंख्य शिक्षक विषय सखोल शिकवू शकत नाहीत. छापलेला भाग पाठ करणे यावरच अशा शिक्षकांचा नाईलाजाने भर असतो ! विषय नीट शिकवता येत नसल्याने आपल्या या कमतरतेकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष जाऊ नये म्हणून गळाबंद(टाय), जोड्यांची चमक(पॉलिश) , कपड्याचे सपाटीकरण (इस्त्री), केस व नखांची कापणी या फालतू बाबींचे अवडंबर माजवून ते विद्यार्थी आणि पालकांचे मन या फालतू बाबीत अडकवून ठेवतात. या फालतू गोष्टींन महत्व देतानाच पाढे पाठ होण्याकडे, अचूक इंग्रजी व्याकरण, योग्य वाक्यरचना याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते. बहुसंख्य इंग्रजी शाळांना अनुदान नसल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण नसते, अशा शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हुशार, सक्षम असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी शिक्षण मिळते आणि त्यांचा पुरेसा सर्वांगीण विकास होत नाही. .
विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या अंगभूत त्रुटींमुळे दुर्दैवाने आणि अनपेक्षितरीत्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी अतिशय कच्चे राहते, त्यांना इंग्रजी व्याकरणाची जाण कमी असते. इंग्रजी संभाषण, लेखन कौशल्यात इंग्रजी माध्यमातील मुलेमुली मागे पडतात. इंग्रजीच कच्चे म्हणून गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, इतर विषय इंग्रजीतून शिकावे लागल्याने कच्चेच राहतात. हे लक्षात आल्यावर मी शहरी, ग्रामीण नागरिकांच्या बैठकात इंग्रजी माध्यमात मुलामुलींचे इंग्रजी कच्चे म्हणून इतर विषयही कच्चे हा मुद्दा मांडला.
मुद्दा पटवून देण्यासाठी उपस्थितांच्या घरातील चौथी ते नववीची मुलेही बोलावली. मराठी माध्यमाच्या इ. सातवी निम्न स्तर (lower level) इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकाचे एक पान निरक्षर आजोबांनी निवडले. मराठी माध्यमात निम्न स्तर(lower level) इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमात उच्च स्तर(higher level) इंग्रजी शिकणाऱ्या सातवीतील मुलांना दोन गटात एकमेकांपासून थोडे लांब बसविले. निरक्षर आजोबांनी निवडलेल्या निम्न स्तर इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पानावरील इंग्रजी मजकूरातील एकेक ओळ गावातील शिक्षकांनी सावकाश वाचली आणि तेव्हाच ओळ मुलांना लिहायला सांगितली. प्रत्येक ओळीसाठी पुरेसा वेळ देत मुलांकडून संपूर्ण पान लिहून घेतले.
सुशिक्षित, उच्चशिक्षित पालकांसमोर ती पाने तपासली. मराठी माध्यमातील मुलांनी इंग्रजी मजकूर संपूर्ण अचूक लिहिला किंवा कमी चुका केल्या. इंग्रजी माध्यमातील मुलांनी स्पेलिंगच्या भरपूर चुका केल्या तसेच ऐकलेले काही शब्द वगळले, काही शब्द मनचे घातले. इंग्रजी लिखाणात योग्य स्पेलिंग, एकाग्रता याबाबत मराठी माध्यमातील मुले अधिक कुशल आढळली.
जे लिखाणाचे तेच बोलण्याबाबत दिसले. याच मुलांना एक विषय देऊन त्यावर स्वत:च्या शब्दात वीस वाक्ये बोलायला सांगितली. मराठी माध्यम मुलांनी थोडा अधिक वेळ घेऊन व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना करून नेमका अर्थ स्पष्ट होईल अशी वाक्ये बोलून दाखवली. इंग्रजी माध्यम मुलांनी जराशा कमी वेळात पण चुकीची वाक्यरचना केली आणि अर्थ स्पष्ट न करणारी वाक्ये बोलून दाखविली. अनेक गावांतील पालकांच्या लक्षात आले की, विनाअनुदानित इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी अतिशय कच्चे, इतर विषयही साहजिकच कच्चे राहतात.
इंग्रजी माध्यमाचा जोरदार आग्रह बाबांपेक्षा आईचा अधिक असतो. इंग्रजी माध्यमात घालताना मुलामुलींच्या माउलीची अपेक्षा असते की मुलाला, मुलीला इंग्रजी अचूक फाडफाड इंग्रजी यावे, इंग्रजी ग्रंथ वाचता येऊन भरपूर ज्ञान मिळावे. ही अपेक्षा मुलांना विनाअनुदानित इंग्रजी शाळेत शिकवून पूर्ण होत नाही. इंग्रजी शाळांमधील मुले इंग्रजी, मराठी दोन्ही पुस्तके वाचत नाहीत. स्वत:चे विचार इंग्रजीतून मुद्देसूदपणे मांडत नाहीत. बाजारातील व्यवहार, एकट्याने प्रवास, इंग्रजी मराठी संभाषण यात लाजरीबुजरी बनतात, त्यांच्या जीवन व्यवहारात आत्मविश्वास कमी दिसतो. अनुदानित मराठी माध्यमातील मुले स्वतंत्र प्रवास, बाजारातील व्यवहार, मराठी इंग्रजी संभाषण आत्मविश्वासाने करतात.
माझ्या व्याख्यानातून, पालकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून मराठी माध्यम अधिक उपयुक्त, यशस्वी असल्याचे समोर आले. १० वी, १२ वी, पदवी, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परीक्षा, नोकरीच्या मुलाखतीत मराठी माध्यमातील मुलांचा इंग्रजी वापराचा वेग थोडा कमी असला तरी अंतिम यश मात्र मराठी माध्यमातील मुलांना मिळते याची माहिती मी, माझ्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील लाखो पालकांना दिली.
मराठी माध्यम शालेय शिक्षणासाठी वरदान आहे हे पटलेल्या ५४००० पालकांनी २०१३ पासून २०१७ पर्यंत मोठा क्रांतिकारी बदल केला. आपली इंग्रजी माध्यमातील मुले त्या शाळांमधून काढून जवळच्या मराठी माध्यम शाळांमध्ये घातली. मराठी माध्यमाचे हे वरदान स्वीकारण्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सहभागी आहेत. मुंबई, पुणे शहरातील पालक मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान सोसून त्यांना इंग्रजी माध्यमातच शिकवत आहेत.
जगात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय शिक्षणातील सर्व पायाभूत विषय पक्के हवेत, मराठी पक्की हवी हे मुंबई पुण्यातील पालकांना समजावून दिले पाहिजे. इंग्रजी सुधारण्यासाठीही मराठी माध्यमातून शिकणे हाच उत्तम पर्याय आहे, हेही सर्व पालकांनी समजावून घेतले पाहिजे. राज्यातील ज्या पालकांनी अजून मराठी माध्यमाचे वरदान आपल्या लाडक्या मुलामुलींना मिळवून दिले नाही त्यांनी ते लवकर मिळवून द्यावे असे मी सुचवतो. ज्याला मराठी भाषा, मराठीतील शब्दांच्या अर्थछटा, मराठी वाक्यातील खाचाखोचा उत्तम समजतात त्याला जगातील इतर कोणतीही भाषा कमी वेळात, कमी श्रमात समजते. जागतिक स्तरावर पहिली भाषा म्हणून मराठी भाषा शिकून घेतली तर संपूर्ण जगातील एकूण भाषिक कौशल्ये सुधारतील. सर्व जगाला वरदान ठरू शकणाऱ्या भाषेचे वरदान आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे.
इंग्रजी माध्यमातून विविध विषय सखोल न समजल्याने इंग्लंडमधील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. इंग्लंडच्या नुकसानीचा वारसा मुलांना न देता सहजसोपे, उत्तम, दर्जेदार, समृद्ध, संपन्न, प्रभावी शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमाचा वारसा लहान मुलांना दिला पाहिजे.
हा लेख वाचणारांना आवाहन की, आपल्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या परिवारातील प्रत्येक मूल मराठी माध्यमात जावे म्हणून प्रयत्न करा. जी मुले सध्या गैरसमजामुळे इंग्रजी माध्यमात असतील त्यांना माध्यम बदलून मराठी माध्यम निवडण्याचा आग्रह धरा.
बालवाडी ते पदवी ! मराठी माध्यमच यशाची आशा !

– प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)
ज्ञानभाषा प्रकाशन ४७१ शनिवार पेठ, पुणे.
संपर्क क्र. ९४२००१६७१