११ वी-१२ वी विज्ञान

Home » ११ वी-१२ वी विज्ञान

११ वी, १२ वी विज्ञान ( सायन्स ) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !

११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र ( PCMB) या विषयांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आता दरवर्षी मराठीतून काढल्या जातात. परीक्षा अर्ज भरताना या विषयांसमोर उत्तराची भाषा स्तंभ ( language of answer column) असतो त्यात ०२ हा संकेतांक निवडला तर विद्यार्थी जिथे परीक्षा देईल त्या केंद्रावर वरीलपैकी हव्या त्या विषयांची मराठी प्रश्नपत्रिका मिळते.

महाराष्ट्रातील काही थोड्याच शाळांमध्ये वरील विषय मराठीतून शिकवतात पण बहुतेक ठिकाणी वरील विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा मात्र मराठीतून देता येते. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केलेल्या या सोयीचा वापर करून दरवर्षी अधिकाधिक विद्यार्थी इंग्रजीतून शिकतात पण मराठीतून पेपर लिहितात आणि अधिक मोठे यशा मिळवतात. आता NIIT परीक्षाही मराठीतून देता येते त्यामुळे  १२ वीला विज्ञान विषय मराठीतून देण्याचा सराव केला तर NIIT परीक्षेतही मोठे यश मिळू शकेल असे  भाषा वैज्ञानिकांचे मत आहे.

११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील लाखो  विद्यार्थ्यांना १२ वीची बोर्डाची ( PCMB) या विषयांची  परीक्षा मराठीतून द्यायची इच्छा असते पण मनात भीती वाटत असते.  आपण दोन वर्षे वर्गात,  शिकवणीत इंग्रजीतून शिकलेल्या विषयाची परीक्षा मराठीतून देताना गोंधळ उडेल आणि नीट पेपर लिहिता येणार नाही असे अनेकांना वाटते.  मनात भीती बाळगण्यापेक्षा बोर्डाचे   PCMB विषयांचे  पेपर एकदा पाहिले, नमुना पेपर सोडवला तर   लक्षात  येते  की,   “ अरे, इंग्रजीतून शिकून सुद्धा  मराठीतून पेपर लिहिणे खूप सोपे आहे.  याने वेळ वाचतो आणि आपल्या मनातील उत्तर नीट, मुद्देसूद, अचूक लिहिता येते .“

आता तर  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,  जीवशास्त्र  (PCB) या विषयांची इ. ११ वी आणि १२ वी ची पुस्तकेही मराठी भाषेतून उपलब्ध झाली आहेत. ती बाजारात मिळतात.  मराठी पेपर व मराठीतील विज्ञानाची पुस्तके दोन्ही पाहून सराव केल्यावर  आत्मविश्वास येतो आणि  विद्यार्थी मराठीतून पेपर लिहितात, मोठे यश मिळवतात.

मी १२ वी विज्ञान ( सायन्स) च्या  सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी अधिक यशासाठी मराठीतून पेपर लिहिण्याचा पर्याय अवश्य वापरावा.  १२ वी विज्ञान मराठी प्रश्नपत्रिका या नावाने वरील चार विषयांच्या प्रश्नपत्रिका सर्वांना पाहण्यासाठी  marathibhasha.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  याचा लाभ घ्यावा.

आपला हितचिंतक

प्रा. अनिल गोरे ( मराठीकाका)    संपर्क क्र. ९४२२००१६७१    marathikaka@gmail.com

[pdf-embedder url=”http://marathibhasha.org/wp-content/uploads/2018/01/Question-paper.pdf” title=”Question paper”]